Showing posts with label सुरेश भट. Show all posts
Showing posts with label सुरेश भट. Show all posts

Thursday, August 4, 2011

तुम्ही काय म्हणता - सुरेश भट

तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही
मी जिवंत आहे - माझा हा प्रमाद नाही !

मैफलीत मंबाजींच्या का म्हणून बोलू
कुणालाच कोणाचीही इथे दाद नाही

हा अथांग सागर उसळे जरी यातनांचा
परत मी घरी जाणारा सिंदबाद नाही

कुणी घाव केला तेव्हा मला आठवेना
पुढे काय झाले माझे ? मला याद नाही !

तुला मीच रडतारडता धीर देत आहे
वादग्रस्त माझे अश्रु ह्यात वाद नाही

सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी
बाद होत गेले सारे, मीच बाद नाही

गीत : सुरेश भट

( Tumhi kaay mhanata yacha maj vishad naahi - Suresh Bhat )

Tuesday, July 5, 2011

तरुण आहे रात्र अजुनी - सुरेश भट

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे... आणि तू मिटलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?

उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा
तू किनाऱ्यासारखा पण कोरडा उरलास का रे?

ओठ अजुनी बंद का रे? श्वास ही मधुमंद का रे?
बोल, शेजेच्या फुलांवर तू असा रुसलास का रे?

गीत : सुरेश भट
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले


Get this widget | Track details | eSnips Social DNA

स्वर : आशा भोसले


स्वर : आरती अंकलीकर-टिकेकर


( Tarun aahe Ratra Ajuni - Suresh Bhat )

Sunday, June 12, 2011

समजावुनी व्यथेला समजावता न आले - सुरेश भट

( ऑडीओ सहित )
समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !

सर एक श्रावणाची आली … निघुन गेली…
माझ्या मुक्या ञुषेला पण बोलता न आले?

सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले!

चुकवुनही कसा हा चुकला न शब्द न माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले !

लपवीत गीत माझे पळ काढला तरीही
ह्रुदयांतल्या विजांना झिडकारता न आले!

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखरे माझे मज टाळता न आला!

गीत : सुरेश भट
संगीत : रवि दाते
स्वर : सुरेश वाडकर


Get this widget | Track details | eSnips Social DNA

श्री संतोष गोळवलकर यांच्या विंनंतीवरून . आभार संतोष, ईतकं सुंदर गाणं सुचवल्याबद्दल.

( Samajauni vyathela samajawata na aale - Suresh Bhat )

Wednesday, May 25, 2011

पहाटे पहाटे मला जाग आली - सुरेश भट

( ऑडीओ सहित )
पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

मला आठवेना... तुला आठवेना ...
कशी रात्र गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली !
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली !
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे, हालचाली !
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली !
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

गीत : सुरेश भट
संगीत : रवि दाते
स्वर : सुरेश वाडकर


Get this widget | Track details | eSnips Social DNA

( Pahate pahate mala jaag aali, tuzi reshamachi mithi sail zali - Suresh Bhat )

गंजल्या ओठास माझ्या - सुरेश भट

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे !

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !

आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे !

गीत : सुरेश भट
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : रवींद्र साठे
चित्रपट - उंबरठा


Get this widget | Track details | eSnips Social DNA



( Ganjalya othas mazya dhar vajrachi milu de - Suresh Bhat )

Sunday, April 24, 2011

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात - सुरेश भट

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

निजलेल्या गावातुन आले मी एकटीच;
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच;
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात !
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर ?
तुज वारा छळवादी अन्‌ हे तारे फितूर !
श्वास तुझा मालकंस ! स्पर्श तुझा पारिजात !
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून,
पण माझी तुळस तिथे गेली रे हिरमुसून
तुझिया नयनात चंद्र ! माझ्या हृदयी प्रभात !
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

स्वर : आशा भोसले
गीत : सुरेश भट
संगीत : हृदयनाथ मंगेशकर






( Chandanyat firatanna maza dharalas haat - Suresh Bhat)

Thursday, April 21, 2011

उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे - सुरेश भट

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजून ही उशीवरी टिपूर चांदणे पडे

उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू ?
पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू ?
पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे

अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला
अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे

अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी
तुला मला विचारुनी फुटेल आज तांबडे
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे

गीत: सुरेश भट
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर






( Ujadalya wari sakhya Nighun jaa gharakade - Suresh Bhat )

Friday, April 15, 2011

मलमली तारुण्य माझे - सुरेश भट

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे

लागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे

कापर्‍या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे, पुन्हा तू पेटवावे

रे तुला बाहुत माझ्या, रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे, तू मला बिलगून जा

गीतकार :सुरेश भट
गायक :आशा भोसले
संगीतकार :सी. रामचंद्र






( Malamali Tarunya maze tu pahate pangharave - Suresh Bhat )

Thursday, March 17, 2011

सूर मागू तुला मी कसा - सुरेश भट

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
सूर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा, मी असा.

तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझा तुझा आरसा
जीवना तू तसा, मी असा

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा
जीवना तू तसा, मी असा

खूप झाले तुझे बोलणे
खूप झाले तुझे कोपणे
मी तरीही जसाच्या तसा

रंग सारे तुझे झेलुनी
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडपिसा
जीवना तू तसा, मी असा

काय मागून काही मिळे ?
का तुला गीत माझे कळे ?
व्यर्थ हा अमृताचा वसा
जीवना तू तसा, मी असा

गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - अरुण दाते




( Sur magu tula mi kasa , jivana tu asa mi asa - Suresh Bhat )

Friday, December 17, 2010

फुटका पेला - सुरेश भट

शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला
मशहूर ज्ञानया झाला....गोठ्यातच जगला हेला

अडवून जरी शब्दांनी भरपूर खुशामत केली
दारात वर्तमानाच्या मी अर्थ उद्याचा नेला!

घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी
वणवणतो पोटासाठी हा राजपुत्र अलबेला

ही कुण्या राजधानीची कापती अजुन खिंडारे?
का कुणी कलंदर येथे गुणगुणत सुळावर गेला?

पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही-"माणूस कोणता मेला?"

जर हवे मद्य जगण्याचे....तर हवी धुंद जन्माची
तू विसळ तुझ्या रक्ताने हृदयाचा फुटका पेला!

(Shevati Vedmantranni annay Evadha kela - Futaka Pyala - Elgar )

Tuesday, December 14, 2010

तू माझ्या आयुष्याची पहाट - सुरेश भट

( ऑडीओ - सहित )
तू माझ्या आयुष्याची पहाट॥
तू माझ्या कॆफ़ाची मत्त लाट..

तू मागील जन्मांची आर्त साद..
तू मानसकुंजातील वेणू नाद..

तू माझ्या एकांताचा प्रकाश..
तू माझ्या गीतांचा बाहुपाश..

तू माझ्या दु:खाची चांदरात..
तू माझ्या स्वप्नांचा पारिजात..

तू अम्रुतभासांचा अंग राग..
तू विझल्या नयनांचा दीप राग..

तू माझ्या जगण्याची वाटचाल..
तू माझ्या रक्ताचा रंग लाल..

तू माझ्या असण्याचा अंश अंश..
तू माझ्या नसण्याचा मधुर दंश..

गीत - सुरेश भट
संगीत - श्रीधर फडके
गायक - श्रीधर फडके




Tu mazya Ayushyachi pahat ...
( Thanks to Anamika for the audio source)

Sunday, June 6, 2010

यार हो - सुरेश भट

सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो

हे नवे फक्त आले पहारेकरी
कैदखाना नवा कोठला यार हो

ते सुखासीन संताप गेले कुठे
हाय, जो तो मुका बैसला यार हो

चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणेही अघोरी कला यार हो

जे न बोलायचे तेच मी बोलतो
मीच माणूस नाही भला यार हो

सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी
जीवनाची टळेना बला यार हो

हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी?
हुंदकाही नसे आपला यार हो

ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो

लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही अता फैसला यार हो

आज घालू नका हार माझ्या गळा
मी कुणाचा गळा कापला यार हो
( Surya kevhach andharala chala yaar ho, ya nava surya aanu chala yaar ho )

Tuesday, June 1, 2010

मी नाही - सुरेश भट

जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही

किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही

जपून वेच, फुले ही जनावरांसाठी
अरे, वसंत असा येत नेहमी नाही!

अम्हास रोज तुझे शब्द सांगतो वारा
तुला कळेल.. तुझी शॄंखला घुमी नाही

धनुष्यबाण जरी शोधशोधतो आम्ही
कसे अरण्य! इथे एकही शमी नाही!

दिलास तूच मला तूच हा रिता पेला
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!

विचारतेस कशी बावरुन ताऱ्यांना..
घरासमोर तुझ्या चांदण्यात मी नाही!
( Jiwant kon kunalach batami naahi )

Sunday, May 30, 2010

रिक्त - सुरेश भट

उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!
( Ugich bolayache, ugich hasayache, ugich kaisetari diwas kadhayache )

Thursday, May 27, 2010

मुक्ती - सुरेश भट

( ऑडीओ सहित )
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी,
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.

वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही
गांजणा-या वासनांची बंधने सारी तुटावी.

संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे ,लोचने आता मिटावी.

सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी.

दूर रानातील माझी पाहुनी साधी समाधी
आसवे सा-या फुलांची रोज खाली ओघळावी.

कोण मी आहे ? मला ठाऊक नाही नाव माझे !
शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी.

हे रिते अस्तित्व, माझे शोध शून्यातील वेडा
माझियामागेच माझी सर्व ही ओझी रहावी !

काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी?
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !

संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - महेंद्र कपूर

( Purtata Mazya vyathechi , maziya mrutut vhavi )

Tuesday, May 25, 2010

भोगले जे दुःख त्याला - सुरेश भट

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले

लोक भेटायास आले, काढत्या पायासवे
अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले

गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले

गायक - आशा भोसले


गायक - रवींद्र साठे

( Bhogale je dukh tyala, sukh mhanave lagale )

Wednesday, May 12, 2010

आसवांचे जरी हसे झाले - सुरेश भट

( ऑडीओ सहित )
आसवांचे जरी हसे झाले
हे तुला पाहिजे तसे झाले

चंद्र आला निघुनही गेला
ऐनवेळी असे कसे झाले

शोधुनी मी तुला कुठे शोधु
चेहऱ्याचेच आरसे झाले

पाहिले दुःख मी तुझे जेव्हा
दुःख माझे लहानसे झाले

आग ओकून मी किती ओकू
शब्द सारेच कोळसे झाले

संपले हाय बोलणे माझे
जे तुझ्याशी कसेबसे झाले

( Aasavanche jari hase zale, he tula pahije tase zale )

Tuesday, May 11, 2010

असेच हे कसे बसे - सुरेश भट

( ऑडीओ सहित )
असेच हे कसे बसे
कसे तरी जगायाचे
कुठेतरी कधीतरी
असायचे नसायचे...

असेच सोससोसता
हसून हासवायचे;
असेच हासहासता
हळूच विव्हळायचे

असाच रहाणार मी
जिता तुरुंग आपला,
अशाच बाळगीन मी
सुटावयास श्रुंखला

असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसे बसे तगायचे
धरून धीर पोरका

अशीच येथली दया
हवेत चाचपायची;
अशीच जीवनास ह्या
पुन्हा क्षमा करायची

असाच श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा

असेच पेटपेटूनी
पुन्हा पुन्हा विझायचे;
हव्याहव्या क्षणासही
नको नको म्हणायचे

असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे;
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे

( Asech he kase base, kase tari jagayche )

Thursday, April 29, 2010

तनमन अमृत बनते ग - सुरेश भट

अमृतमय मी, अमृतमय तू, तनमन अमृत बनते ग;
अमृतमय श्वासात आपुल्या अमृतनभ थरथरते ग!

अमृतमय मौनातच रिमझिम रिमझिमती अमृतधारा;
भिजते माझे अंगअंग, पण अंग तुझेही भिजते ग!

रुधिरातील कल्लोळ हावरा रुधिराताच फिरला विरला;
एकच इवले कातर स्पंदन अंतरात किलबिलते ग!

आत्म्याच्या चांदण्यात अपुल्या हुरहुरत्या हाका घुमती;
जन्माच्या वेलीचे सावध पानपान सळसळते ग!

कायांचा कापूर बंद पण दरवळ बघ तरळत उठला;
स्पर्शाविण स्पर्शांचे वादळ धमन्यातुन भिरभिरते ग!

प्राणाच्याही पार आपुल्या कुठेतरी भेटी घडती;
गडे, मला हे जाणवते अन् तुजलादेखिल कळते ग!

स्वप्नाफुलानी आज शिगोशिग डोळ्यांची परडी भरली;
तुझी नव्हाळी, माझी तगमग... कोण कुणाला खुडते ग?
( Amrutamay mi amrutmay tu , tan man amrut banate ga )

Wednesday, April 28, 2010

थेंब - सुरेश भट

काय जे होणार माझे, ते मला माहीत आहे!
मी तुझ्यासाठी तरीही जिन्दगी जाळीत आहे!

पहिला जो चेहरा मी, तो कुठे माझा निघाला?
मी कधीपासून माझा चेहरा शोधीत आहे!

शेवटी झालेच नाही चांदणे माझे तरीही
मी कुठे हा तू दिलेला चन्द्र नाकारीत आहे!

चालणारया यात्रिकांना रोखले कोणी कळेना,
हा सुना रस्ताच आता पावले टाकीत आहे!

का करू आता खुलासा? सांगण्याची वेळ गेली
कालच्या माझ्या चुकांनो, आज मी घाईत आहे!

वाटतो आहे जगाला हा जरी पेला रिकामा,
मी तळाशी राहिलेले थेंब काही पीत आहे!
( Kaay je honaar maze, te mala mala mahit aahe,
Mi tuzyasaathi tarihi, zindagi jalit aahe )