Wednesday, June 22, 2011

कविता : बिननावांच्या बिनचेहऱ्याच्या - अशोक पुंडे

1.

कुठूनशी एक आठवण येते
घेऊन येते विचारांची वाळलेली पानं
चालताना प्रत्येक पानं देतंय हुंकार
वाढतंच जाते विचारांची आणि आठवणींची गुंतावळ
घट्ट बंद केलेत मनाचे दरवाजे
तरीही थोड्याशा फटीतून येतच राहतात त्या
सलणारी जखम उघडी करण्यासाठी ...............

2.

आज पुंन्हा एकदा दिसलास तू
नजर चुकाउन पळायच्या प्रयन्तात होतास तू
खजील झालेला चेहरा तुझा
केविलवाणी नजर तुझी
तू होतास एक चुकलेला निर्णय
आयुष्याच्या एका वळणावर भेटलास तू,
स्वतःही चुकलास आणि मलाही चुकवलस ..............

3.

आयुष्याच्या संध्याकाळी माझ्या
दिसली माझी आई एका कोपऱ्यात
ती सुद्धा जुनी झाली आता
दाट सावलीसारख असणं तिचं
डोक्यात फिरणारे थरथरणारे हात तिचे
डोळे बंद करताच येतो तिचा चेहरा समोर
ओलावतात डोळे पुंन्हा पुंन्हा आठवणीने तिच्या .............

4.
पडझडीचे दिवस आजही आहेत
जसे काल नव्हते तसे नवेही येत आहेत
अशा दिवसानाही केले सुसह्य
त्यावरच केली आजवरची वाटचाल
पाय झिजले वर्तमानकाळाचा कायापालट करताना
संपले दिवस
संपला उपयोग
होऊ लागली अडचण
एका बेसावध क्षणी आलो इथे
स्वयंनिर्णयाला देखील स्वीकृती नव्हती
आता संवेदनशील जाणीवा देखील ठेवायच्या नाहीत
आता नाही आशेच फुल
आता नाही अपेक्षांचा पक्षी
एखादा संवाद फक्त मौनातच उमलणारा
खिन्न सूर्योदय
भरकटलेला दिवस
निराशेचा सूर्यास्त
मलूल चंद्रदोय
जीवघेणी रात्र
कोरड्या त्रयस्थ नजरा
बेदखल झालेलं अस्तित्व
पोहोचताच येत नाही कोणाजवळ
भाषा संपली
अस्तित्व झाल उपयोग नसलेल्या सहाव्या बोटासारख
हळू हळू वागवलं जातंय जगण्याच्या या चौकटीतून बाहेर काढल्या सारखं
नात्याचे गुंते संपताना तिळ तिळ तुटते आहे आतडं
पण आता दुसऱ्याच्या भावनेवर टाकलेलं आयुष्य उचलून दूर जाणार आहे
मृत्यूचा पापणी नसलेला डोळा बघण्यासाठी ...........................................

कवि : अशोक पुंडे
संग्रह : कविता - बिननावांच्या बिनचेहऱ्याच्या

( Kavita Bin navacha bin Cheharyanchya - Ashok Punde )

2 comments:

  1. mala tumacha blog far aawadala... :)
    pan mala tyachi rachanahi titakich aawadali.. mi hi nawin blog suru kelay, ajun nawinach aahe mi...
    mala 1 sangal? ya blog la warati jya Tags banawalyat, tya kasha banawalyat? e.g. kavinchi nawe lihun aapan ji wargawari keliye na, tya baddal v4rat aahe mi..

    ReplyDelete
  2. Sukhada KshirsagarMarch 15, 2012 at 2:10 PM

    Sagalya kavita khup sundar ahet, ashach kavita karat raha

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.