दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू ?
धरेस भिजवुन गेल्या धारा
फुलून जाइचा सुके फुलवरा
नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?
शारदशोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?
पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभि पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ?
गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : सुधीर फडके
स्वर : आशा भोसले
|
( Jivalaga kadhi re yeshil tu - Ga Di Madgulkar)
No comments:
Post a Comment
Please comment. Your review is very important for me.