दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होउं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
गीत : ग. दि. माडगूळकर ( गीतरामायण )
संगीत : सुधीर फडके
स्वर : सुधीर फडके
|
( Paradhin aahe jagati putra manavacha - Ga Di Madgulkar )
No comments:
Post a Comment
Please comment. Your review is very important for me.