Wednesday, April 7, 2010

हा काळ हरामी - कैलास गांधी

वाटेत भेटतो रोज मला धमकावून जातो
हा काळ हरामी मलाच गंडा घालून जातो

घुसतेच कशी हि घरात माझ्या तिरीप कोवळी
मी रोज घराची खिडक्या दारे लावून जातो

इथे मुक्याचे नाणे कधीही वाजत नाही
फक्त बोलका भाव नेहमी खावून जातो

मी देतो शिक्षा माझ्यामधल्या अपराध्याला
जो आरोप नेहमी माझ्यावरती ठेवून जातो

मी पुढे चाललो आहे कि परतीच्या वाटेवर
हा प्रश्न सारखा तुला मला भंडावून जातो

तो फक्त जमवतो जाहिरातींचे कपटे काही
अन पत्रकार मी खुशाल तरीही सांगून जातो

मी ऋण मानतो फक्त तयाचे माथी माझ्या
तो एक कवी जो काळाला ओलांडून जातो

- कैलास गांधी

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.