Sunday, January 23, 2011

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या - कवी बी

( ऑडीओ सहित )
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"

पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?

नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी

प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

"गावी जातो" ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा"

स्वर-उदय कुडतरकर
संगीत -श्रीधर फडके
कवी-बी



( Gaai panyawar kaay mhanuni aalya - Kavi B - Narayan Murlidhar Gupte )

2 comments:

Please comment. Your review is very important for me.